Log In


                

<April 2024>
SuMoTuWeThFrSa
31123456
78910111213
14151617181920
21222324252627
2829301234
567891011
मराठी ग्रंथसंग्रहालय हैदराबाद.(दक्षिण)
मराठी ग्रंथ संग्रहालय, हैदराबाद, आपली नव्वदी पार करून ती शतकाकडे दमदार वाटचाल करत आहे. निझामी राजवटीची राजधानी हैदराबाद, येथे मध्यवर्ती भागात एक परिपूर्ण ग्रंथालय असावे असे येथील मराठी समाजास वाटत होते आणि म्हणूनच कै. न्या. केशवराव कोरटकर, कै. श्री. पांडुरंगराव जोशी , कै. श्री. काशिनाथराव वैद्य, कै. श्री. लक्ष्मणराव फाटक, कै. डॉ. हरी रामकृष्ण गोगटे प्रभृतींनी कार्तिक शुद्ध प्रतिपदा २२ आक्टोबर १९२२ रोजी कै. श्री. पांडुरंगराव जोशी यांच्या वाड्यात मराठी ग्रंथ संग्रहालयाची स्थापना केली. कालांतराने कै. श्री. माधवराव लेले यांच्या घरी स्थलांतर झाले.
संस्थेच्या व्यवस्थापनेसाठी १९३६ साली एक घटना तयार करण्यात आली. १९४३ साली कै. श्री. चि. नी. जोशी, अध्यक्ष व कै. श्री. रा. ब. माढेकर, कार्यवाह अशी निवड होऊन या दोघांच्या अथक प्रयत्नाने १९४६ च्या सुमारास, आज ज्या जागेवर संस्था उभी आहे, ती जागा संस्थेच्या ताब्यात आली. संस्थेच्या नव्या इमारतीच्या बांधकामाचा कोनशिला समारंभ २६ मे १९४७ रोजी कै. डॉ. किर्लोस्कर यांच्या हस्ते झाला. यासाठी मोठया प्रमाणावर आर्थिक मदत कै श्री. पांडुरंगराव हर्डीकर यांनी आपले वडील कै. बॅ. विठ्ठलराव हर्डीकर यांच्या स्मरणार्थ रु. १५,००० /- देणगी देऊन केली व त्यानंतर समाजातील अनेक व्यक्तींनी देणग्या देऊन मोठा निधी उपलब्ध करून दिला.  भारताचे तत्कालीन बांधकाममंत्री कै. श्री. न. वि. गाडगीळ यांच्या हस्ते जुलै १९५१ मध्ये सभागृहाचे उद्‌घाटन झाले.


  संस्थेच्या धडपडीच्या काळात जवळजवळ ३६ वर्षे विविध पदांवर कार्य करून कै. श्री. रा. ब. माढेकर यांनी संस्थेचा कायापालट केला. तत्कालीन शिक्षणमंत्री कै. न्या. गोपाळराव एकबोटे यांचे पाठबळ फार महत्वाचे होते. त्याचप्रमाणे प्रसिद्ध इतिहासकार कै. श्री. सेतुमाधवराव पगडी, पत्रकार, संशोधक, कै. प्रा. श्री. र. कुलकर्णी, आ. प्र. विधानसभेचे मा. उपसभापती कै. श्री. वासुदेवरव नाईक, कै. श्री. र. मु. जोशी, कै. श्री. व. दे. थत्ते, कै. न्या. विनायकराव वैद्य, कै. श्री. हरिहरराव देशपांडे यांचेही महत्वाचे योगदान आहे. १९३६ साली तयार केलेली घटना १९४६ साली सुधारित स्वरुपात तयार झाली. आणि १९६२ साली अधिक व्यापक घटना बनवून २९ फेब्रुवारी १९६२ पासून अंमलात आली. कै. श्री. काशिनाथराव वैद्य सभागृहाचे उद्‌घाटन आ. प्र. राज्याचे तत्कालीन राज्यपाल कै. श्री. खंडुभाई देसाई यांच्या हस्ते २१ जुलै १९६८ रोजी झाले. या सभागृहासाठी वैद्य कुटुंबीय तसेच लोकल लायब्ररी अथोरीटीकडून मोलाची आर्थिक मदत मिळाली (देणगी स्वरुपात). १९७२ साली सुवर्ण महोत्सव(राजकीय अस्थिरतेमुळे पुढे ढकलला गेला होता) तर १९८१-८२ वर्ष हीरक महोत्सवी वर्ष यशस्वीपणे पार पाडण्यात आले. कै. डॉ. एम्. एस्. देशपांडे, कै. डॉ. वसंतराव साडेकर आणि श्रीमती शुभदा लेले यांनी मोठया प्रमाणावर निधी जमा करून, कार्यक्रम आयोजित करून संस्थेची आर्थिक स्थिती सुधारण्याच्या कामी महत्वाचे योगदान दिले. कै. श्री. ल. श. वैद्य यांच्या कार्यवाह पदाच्या काळात संस्थेने लक्षणीय प्रगती केली याची इथे नोंद घेणे आवश्यक आहे. संस्थेच्या अध्यक्षपदी कै. डॉ. एम्. एस्. देशपांडे, श्री. भारत देगलूरकर, अड. नारायणराव देशपांडे, डॉ. पद्माकर दादेगावकर, डॉ. विजय पांढरीपांडे या प्रतिष्ठित ज्येष्ठ कार्य करून, नवनव्या संकल्पना ग्रंथालयात राबविण्याचा अथक प्रयत्न केला. या सर्व कामात घटनेत नमूद केल्याप्रमाणे विश्वस्त मंडळाची रचना करून त्या सर्व विश्वस्त मंडळावरील सभासदांचे योग्य ते मार्गदर्शन मिळत गेले. विश्वस्त मंडळावर डॉ. प्र. गो. निमगावकर, श्री. धन्यकुमार जोशी, श्री. धनंजय कोरटकर, श्री. अनिल राजेश्वरराव, श्री. गौरीशंकर पळणिटकर, श्री. एस्. के. दातार, श्रीमती शुभदा लेले, श्रीमती कुमूदिनी भोळे ( ज्या कार्यवाह म्हणूनही संस्थेत कार्यरत होत्या) यांनी वेळोवेळी कार्य करताना आपला अनुभव, मार्गदर्शन संस्थेसाठी उपलब्ध करून दिले. त्याचप्रमाणे पंधरा वर्ष कार्यवाह म्हणून उत्तम कामगिरी बजावणारे मा. कार्यवाह श्री. अनंतराव कुलकर्णी यांचे महत्वाचे योगदान आहे. संस्थेत ११ जून २००० रोजी झालेल्या सभेत नवीन घटना मंजूर करण्यात आली, तीच आजपावेतो कायम आहे. संस्थेच्या आजच्या स्वरुपात हैदराबादेतील मराठी समाजाचे बहुमोल योगदान आहे, त्यातील महत्वाचे, कै. पांडुरंगराव हर्डीकर, वैद्य कुटुंबीय,  डॉ. नारायणराव देशमुख, श्री. विनय एल्. देशपांडे, श्रीमती शुभदा लेले, श्री. दिगंबरराव खळदकर, कै. श्री. दिनकरराव बिंदू श्री. व सौ. शुक्ल तसेच आणि इतर अनेक मंडळी, लॉंयन्स क्लब ऑफ हैदराबाद, आंध्रा बॅंक, राजाराम मोहन रॉय फाउंडेशन,  तसेच मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या घडामोडी, आगामी पुस्तकाची सूची, ग्रंथ परिक्षणे यांची माहिती करून देणारे " ग्रंथायन " पत्रिका काही काळ प्रसिद्ध केली जात होती.